

धीरज बरगे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेल्या अर्थसाहाय्यामुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. यामधून महिलांचे सक्षमीकरण होत असून, यशस्वी व्यावसायिका म्हणून त्या पुढे येत आहेत. बँकेने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण कर्ज योजनेला प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक वर्षात योजनेंतर्गत 16 हजार 775 महिलांना 50 कोटी रुपये कर्जपुरवठा बँकेने केला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी जिल्हा बँकेने 1 एप्रिल 2025 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कर्ज योजना सुरू केली. योजनेंतर्गत महिलांना मिळणारे पैसे योग्य कामी खर्च व्हावेत, यामधून त्यांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू करावेत, या उद्देशाने बँकेने ही योजना सुरू केली. योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला 30 हजारांचे अर्थसाहाय्य केले जात आहे.
...अशी राबवली जाते योजना
योजनेंतर्गत महिलांना 36 महिने मुदतीने 10 टक्के व्याज दराने 30 हजार रुपये कर्जपुरवठा होतो. यामध्ये संबंधित महिलेचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणारे खाते जिल्हा बँकेतच असणे आवश्यक आहे. खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले की, ते कर्जाच्या मासिक हप्त्यामध्ये जमा करून घेतले जातात. यामुळे महिलांना अर्थसाहाय्यही मिळत असून, कर्जाचे हप्तेही आपोआपच जमा होत असल्याने कर्ज परतफेडीचेही टेन्शन राहत नाही.
चालू आर्थिक वर्षात कर्ज मर्यादेत वाढ
चालू आर्थिक वर्षात बँकेने कर्ज मर्यादेत वाढ केली आहे. योजनेंतर्गत महिलांना आता 50 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे. कर्ज परतफेडीसाठी 48 महिन्यांची मुदत असणार असून, मासिक हप्ता 1,268 रुपये राहणार आहे.