Kolhapur Chain Snatching | मंगळसूत्र लांबवणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद : तीन पोलिस ठाण्यांतील गुन्हे उघडकीस

वडगाव पोलिसांची कारवाई; २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त,
Kolhapur Mangalsutra Snatchers Arrested
दोन सराईत चोरट्यांना वडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केलीPudhari
Published on
Updated on

Kolhapur Mangalsutra Snatchers Arrested

नवे पारगाव : नवे पारगाव येथील पाडळी रस्त्यावर शेतात पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पसार झालेल्या दोन सराईत चोरट्यांना वडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. आरोपींकडून सोन्याचे मणीमंगळसूत्र आणि चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकींसह एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वडगाव पोलिस ठाण्यासह सांगली जिल्ह्यातील संजयनगर आणि सातारा जिल्ह्यातील वाई पोलिस ठाण्यांतील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवे पारगाव येथील उर्मिला उत्तम चाळके (वय ४१) या ३ सप्टेंबर २०२६ रोजी पाडळी रस्त्यावरील शेतात पायी जात होत्या. ए. बी. पी. शाळेसमोर त्या पोहोचल्या असता, मागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील १०.६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kolhapur Mangalsutra Snatchers Arrested
kolhapur | गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापुरात १६० कृत्रिम कुंड

गुन्ह्याचा तपास सुरू असताना खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय हारुगडे यांच्या तांत्रिक विश्लेषणातून संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानंतर लक्ष्मण चंद्रकांत चाळके (वय ३४, रा. चांदोली वसाहत, वाळवा रोड, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) आणि अमित नानासो बुधावले (वय २८, मूळ रा. बुधावलेवाडी, ता. खटाव, जि. सातारा; सध्या रा. लोकमान्यनगर, कोरोची, ता. हातकणंगले) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून १०.६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल आणि होंडा ॲक्टिव्हा मोपेडसह एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Kolhapur Mangalsutra Snatchers Arrested
Kolhapur Crime : ड्राय-डे दिवशी शिरोली परिसरात दारूविक्री, दोघांवर कारवाई ८ हजारांचा मुद्देमाल जप्त!

या कारवाईमुळे वडगाव पोलिस ठाण्यातील गुन्ह्यासह सांगली जिल्ह्यातील संजयनगर आणि सातारा जिल्ह्यातील वाई पोलिस ठाण्यांतील चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सायबर पोलिस ठाण्याचे संजय हारुगडे, वडगावचे पोलिस निरीक्षक गोरख चौधर, पोलिस उपनिरीक्षक खलील इनामदार, माधव डिगोळे, पोलिस अंमलदार इंद्रजित शिंदे, शेखर कदम, नितीन जाधव आणि शरद मेनकर यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खलील इनामदार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news