

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गौरी-गणपती विसर्जनासाठी महापालिकेने ठिकठिकाणी तब्बल १६० कृत्रिम विसर्जन कुंड तयार केले जात आहेत. त्याबरोबरच अडीच हजार कर्मचाऱ्यांसह ३०१ टेम्पो, १३०० हमाल, ७ जेसीबी, ७ डंपर, ८ ट्रॅक्टर, ४ पाण्याचे टँकर, २ बूम, ५ रुग्णवाहिका, ५ साधे तराफे, १० फ्लोटिंग तराफे आणि २ क्रेन अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
इराणी खण येथे स्वयंचलित यंत्रणा
घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी महापालिकेत आढावा घेतला. सहायक आयुक्तांनी आपल्या क्षेत्रात आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या. मुख्य रस्त्यांवरील पॅचवर्कची कामे रात्रीच्या वेळेत करण्याचे निर्देश दिलेत. इराणी खण येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी गुरुवारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. विसर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येत आहेत.
पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये, यासाठी सर्व प्रभागांमध्ये विविध ठिकाणी १६० गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत कुंड बसवून त्यात पाणी भरण्यात येणार आहे. पवडी विभागाच्या माध्यमातून नागरिकांनी कृत्रिम विसर्जन कुंडांमध्ये विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती एकत्रित करून टेम्पोद्वारे वाहतूक करत इराणी खणीमध्ये विसर्जित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र पथके
शहरातील १४ प्रमुख विसर्जनस्थळी प्रत्येकी १५ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तैनात करण्यात येणार आहेत. संकलित केलेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, कसबा बावडा, दुधाळी आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथे स्वतंत्र खड्डे तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी निर्माल्याचे विलगीकरण करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ व किरणकुमार धनवाडे, नागेंद्र मुतकेकर, सहा.आयुक्त उज्ज्वला शिंदे, डॉ. विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहा. अभियंता अमित दळवी आदी उपस्थित होते.
कृत्रिम कुंडातच विसर्जन करा : आयुक्त
गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांमध्येच गणेशमूर्तीचे विसर्जन तसेच निर्माल्य कुंडामध्ये निर्माल्य जमा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. भारूड यांनी केले आहे.