

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या केटीएम दुचाकीला अचानक आग लागली. ही घटना टोप (ता. हातकणंगले) येथील कासारवाडी फाटयाजवळ आज (दि.२८) दुपारी २ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकी जळून खाक झाली. या घटनेमुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
चिकुर्डे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रमोद कुंभार हा आपल्या केटीएम दुचाकीवरून (एम.एच.०९ एफ के ४४३४) कोल्हापुरकडे कामानिमित्त जात होता. टोपजवळ आल्यानंतर अचानक गाडीने पेट घेतला. यामुळे प्रमोद याने गाडी महामार्गावर थांबवून बाजूला गेला. त्यानंतर गाडीने अधिकच पेट घेतला. यावेळी येथील नागरिकांनी पाणी, माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. शिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
हेही वाचा