कोल्हापूर : पोलिस दलात तब्बल दोन हजार पदे रिक्त! | पुढारी

कोल्हापूर : पोलिस दलात तब्बल दोन हजार पदे रिक्त!

कोल्हापूर, दिलीप भिसे : राजकीय आणि सामाजिकद़ृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह पाचही जिल्ह्यांत अट्टल गुंडांसह माफिया टोळ्यांचे वर्चस्व आणि दहशत वाढत आहे. समाजकंटकांवर वर्दीचा धाक राहिला पाहिजे, ही भावना स्वाभाविक असली तरी अपुरे मनुष्यबळ, अत्याधुनिक साधनसुविधांचा अभाव असेल तर… सद्यस्थितीत कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत एकूण मंजूर पदांपेक्षा अधिकारी, पोलिसांची दोन हजारांवर पदे रिक्त असल्याने आणीबाणीच्या काळात यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीणसह पुणे ग्रामीण क्षेत्रात 2021 व 2022 या कालावधीत गंभीर गुन्ह्यांचा टक्का वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्हेगारी टोळ्यांना जरब बसविण्यासाठी यंत्रणेवर अनेक मर्यादा येत आहेत. वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख या तुलनेत पोलिस दलाची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येते. त्यासाठी मनुष्यबळासह यंत्रणा अद्ययावत करणे गरजेचे आहे.

अपुर्‍या मनुष्यबळामुळे पोलिस दलाची कसरत

कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, सांगलीसह पाचही जिल्हे राजकीय, सामाजिकद़ृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या काळात ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारीही फोफावली आहे. खासगी सावकारीसह संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे कारनामे वाढले आहेत. एकूण लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेता पोलिस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपुर्‍या मनुष्यबळामुळे त्यांच्यावर मर्यादा येत आहेत.

कोल्हापूर, सांगलीत उपअधीक्षकपदाची 8 पदे रिक्त

पोलिस उपअधीक्षकपदाची कोल्हापुरात 3, सांगलीत 5, पुणे ग्रामीणला 3 आणि सातारा येथे दोन पदे रिक्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शाहूवाडी तसेच सांगली जिल्ह्यात जत, इस्लामपूर, मिरज, उपअधीक्षक (गृह) व आर्थिक गुन्हे शाखेतील उपअधीक्षकांची पदे रिक्त आहेत. इस्लामपूरचे तत्कालीन उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची पाच महिन्यांपूर्वी बदली होऊनही त्यांची अजूनही पोस्टिंग झालेली नाही.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची 98 पदे रिकामी!

कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पोलिस उपअधीक्षकपदाची 41, पोलिस निरीक्षक 147, सहायक पोलिस निरीक्षक 243, पोलिस उपनिरीक्षक 411, पोलिस अंमलदार 10 हजार 725, तर महिला पोलिस 2 हजार 410 पदे मंजूर असताना प्रत्यक्षात 1 हजार 850 पेक्षा जादा पदे रिक्त आहेत. कोल्हापुरात पोलिसांची (116), सांगली (142), सातारा (338), सोलापूर ग्रामीण (234), पुणे ग्रामीणला 972 पदे रिक्त आहेत. परिक्षेत्रांतर्गत पाचही जिल्ह्यांत उपअधीक्षकांपासून उपनिरीक्षकांपर्यंत 98 पदे रिकामी आहेत.

Back to top button