

म्हाकवे, पुढारी वॄतसेवा : आनुर तालुका कागल येथे बानगे चौकात टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत दोनजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. काकासाहेब किल्लेदार असे एका जखमी व्यक्तीचे नाव आहे. तर एकाचे नाव समजू शकलेले नाही. सावर्डे येथील टेम्पो एम एच 09 MV 8328 हा बस्तवडेकडून गोरंबेकडे येत होता. याचवेळी म्हाकवेकडून बानगेकडे जाणाऱ्या दुचाकी स्वराला टेम्पोची जोरदार धडक बसल्याने ते दोघे बाजूला फेकले गेले. दुचाकी टेम्पोच्या खाली गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी किल्लेदार यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. दुसऱ्या जखमीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
जखमींना कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. आनुर येथील हा चौक मृत्यूचा सापळा बनला असून आतापर्यंत या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत. कागल मुरगूड या मार्गावरून वाहतूक करणारे वाहने अत्यंत वेगाने जात असतात याचवेळी आनुरगावातून बानगेकडे जाताना येथे अनेक वेळा अपघात झाले आहेत. या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.