

विशाळगड; सुभाष पाटील : पर्यटनाला जायचे तर पहिल्यांदा डोळ्यासमोर येते निसर्गसमृद्ध आंबा गिरीस्थान, किल्ले विशाळगड आणि साडेतीनशे वर्षांपूर्वी घडलेल्या रणसंग्रामातील पावनखिंड. उन्हाळ्यातील थंड हवा, पावसाळ्यात संततधार आणि हिवाळ्यात थंडी, दाट धुके पर्यटकांना नेहमीच खुणावते. येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना डोळ्याचे पारणे फेडते. ही ठिकाणे वर्षातील बाराही महिने पर्यटकांनी गजबजलेली असतात. शिवराय आणि बाजीप्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनखिंडीविषयी तर पर्यटकांना खास आकर्षण
तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडणारा परिसर म्हणजे आंबा आणि विशाळगड. जैवविविधता आणि उंचच उंच डोंगररांगा यामुळे हा परिसर नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. बाराही महिने हिरवागार निसर्ग आणि थंड हवा यासाठी प्रसिद्ध असलेला आंबा आणि आंबा घाट पर्यटकांची तहानभूक हरवतो. हौशी पर्यटकांना आंबा-विशाळगड किंवा पावनखिंड-विशाळगड या मार्गावर ट्रेकिंगचाही अनुभव घेता येतो. नैसर्गिक वरदान लाभलेल्या या परिसरात राज्यप्राणी शेकरू, राज्य फूल जारूल, राज्य पक्षी हरेल व राज्य फुलपाखरू ब्ल्यू मोर्मोन यासह दर्मीळ असलेला माउस डीअर (गेळा), रानगवे, हॉर्नबील, गरुड तसेच औषधी वनस्पतींचा खजिना दृष्टीस पडतो. आंब्यातली देवराई, निसर्ग माहिती केंद्र, सासनकडा, मानोली धरण येथेही पर्यटक गर्दी करतात. थकूनभागून आलेल्या पर्यटकांसाठी मोठ्या संख्येने असलेली रिसोर्टस् नेहमीच स्वागतासाठी सज्ज आहेत. कोल्हापुरी तांबडा- पांढरा रस्सा, रानमेव्यांची सरबराई यामुळे पर्यटकांची चांगली पोटपूजा होते. मलकापूर, आंबा, विशाळगडाचा पायथा या ठिकाणी तर ऐन उन्हाळ्यात जांभळे, करवंदे, तोरणे, रातांबी, अळू, काजू, फणस या रानमेव्याचा आस्वाद घेता येतो. हौशी पर्यटकांसाठी आंबा घाट, वाघझरा, कोंकण पॉईंट, पावनखिंड व जकल्ले विशाळगड या मार्गावरील जंगल सफारी करण्यासाठी आंबा येथे खास वाहनांची सोयही करण्यात आली आहे
पावनखिंड- विशाळगड या तेरा किलोमीटरच्या मार्गावर दाट झाडी, वेडावाकडा घाट आहे. गडावर मलिक रेहान दर्गाह, टकमक दरी, पावनखिंडित प्राणार्पण केलेल्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू यांच्या समाधी, हजारो फूट खोल दऱ्या या साऱ्या गोष्टी पर्यटकांना पहावयास मिळतात
अंतर : कोल्हापूरपासून ६० किमी. मार्ग : कोल्हापूर, बांबवडे, मलकापूर, माण, पांढरेपाणी, पावनखिंड, भाततळी. दुसरा मार्ग : कोल्हापूर, मलकापूर, आंबा, विशाळगड, घाट केंबुर्णेवाडी, भाततळी.
काय पहाल : ऐतिहासिक पावनखिंड बदलले दृश्य, घाटाचे निसर्गसौंदर्य, नागमोडी व तीव्र उताराचा घाट, घनदाट जंगल, जैवविविधता, समृद्ध वनराई रानगवे, सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य, कोकण पॉईंट, विशाळगड घाटातील वाघझरा, विशाळगड, गेळवडे धरण
मुंढा दरवाजा, रणमंडळ टेकडी, भूपाल तलाव, घोड्याच्या पागा, पंतप्रतिनिधी वाडा, मलिक रेहान दर्गा, शिवकालीन विहीर, बाजी – फुलाजी प्रभू देशपांडे समाधी, अमृतेश्वर महादेव मंदिर, मारुती टेक मंदिर, विठ्ठलाई, नरसिंह, राम, गणेश मंदिरे, हत्ती महल, कोकण दरवाजा, टकमक कडा आदीचे दर्शन घेता येते. विशाळगडावर खासगी निवासस्थाने पर्यटकांसाठी मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत.
अंतर : कोल्हापूरपासून ६५ किलोमीटर
मार्ग : कोल्हापूर, मलकापूर, आंबा काय पाहाल? : घाटातील निसर्ग सौंदर्य, जंगल, समृद्ध वनराई, रानगव्यांचे दर्शन, निसर्ग माहिती केंद्र, गायमुखातून बारमाही वाहणारे पाणी, आंबेश्वर देवराई, सासनकडा, सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य, कोकण पॉईंट, जवळच असणारा वाघझरा, पावनखिंड, विशाळगड.
काय खाल? : गावरान कोंबड्याचा तांबडा-पांढरा रस्सा, ज्वारी, नाचणीची भाकरी, झुणका-भाकर
कुठे राहाल ? : आंबा, विशाळगड, मलकापूर
केव्हा जावे ? : कोणत्याही ऋतूत जाण्याची सोय : दुचाकी, चारचाकी, एसटी बसेस