

Illegal Goa Liquor Seized
चंदगड : तिलारी ते चंदगड मार्गावरील पार्ले (ता. चंदगड) गावच्या हद्दीत चंदगड पोलिसांनी शुक्रवारी (दि. १) सायंकाळी सुमारे ४ वाजता मोठी कारवाई करत ९ लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त केली. या कारवाईत एकूण सुमारे १४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी शेखर मारुती सावंत (वय ३६, रा. नागनवाडी, ता. चंदगड) आणि किशोर अनंत लोंढे (वय ४०, रा. साठेली भेडसी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान विविध कंपन्यांच्या एकूण ४,२७२ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे ९ लाख २४ हजार रुपये आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेले अंदाजे ५ लाख रुपये किमतीचे वाहन, २० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि चार सिमकार्डही जप्त करण्यात आले.
सदर आरोपींनी संगनमत करून गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररीत्या वाहतूक करून शासनाचा कर चुकविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ऋषिराज कोरवी यांनी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे पुढील तपास करत आहेत.