

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : कालकुंद्री (कोल्हापूर) येथील नंदा नामदेव जोशी ( वय ४८ ) या विधवा महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची फिर्याद तिचा मुलगा भरमू नामदेव जोशी याने चंदगड पोलिसांत दिली असून त्याने आपल्या आईचा खून झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बुधवारी (दि. १३) सायंकाळी ७ वाजता मृत महिलेचा मुलगा भरमू हा दूध घालण्यासाठी गेला होता. घरी आल्यानंतर आई नसल्याचे दिसून आल्यानंतर रात्रभर तीचा शोध घेतला. घराजवळच असलेल्या कृष्णा दत्तू पाटील यांच्या पटकी नावाच्या शेतात रात्री अडीचच्या सुमारास मृतदेह आढळला. गळा दाबल्याचे व्रण दिसत होते असे भरमू याने तक्रारीत म्हटले आहे. मात्र शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नंदा यांच्या मागे तीन मुलगे असा परिवार आहे.
या बाबतचा व्हिसेरा पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. व्हिसेरा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यामागचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र मुलगा भरमू याने आपल्या आईचा जुन्या वादातून घातपात झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत गावातील एका संशयिताची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
हेही वाचा