

अब्दुल लाट (जि. कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा : अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथे झालेल्या वादळी वाऱ्याने जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेचे नुकसान झाले. जोरदार वा-याने शाळेच्या खोल्यांवरील पत्रे उडून गेले.
शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास अब्दुल लाट परिसरात जोरदार वादळी वारा सुटला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. यावेळी प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे व विद्युत खांब पडले. अनेक ठिकाणी घराचे छत व पत्रे उडाले.
अब्दुल लाट येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांवरील तसेच ऑफिसवरील सर्वच पत्रे अँगलसह उचकटून उडून जाऊन शाळेच्या आवारात पडले. यातील काही पत्रे अँगलसह उचकटून शाळेच्या बाहेरील विद्युत खांबावर पडले. यामुळे विद्युत खांब वाकून तारा तुटल्या. सुदैवाने शाळेत विद्यार्थी, शिक्षक नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.