

MSRTC Student Helpline Number 1800221251
प्रा.शाम पाटील
मुदाळतिट्टा : शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाची १८००२२१२५१ या क्रमांकाची हेल्पलाइन ' सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
राज्यभरातील लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटी महामंडळ शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी बस फेऱ्या उपलब्ध करून देत असते. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला जा - ये करण्यासाठी मासिक पास मध्ये ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. तसेच ' पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ' योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो.
शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या . तसेच संध्याकाळच्या वेळी शाळा -महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. परंतु, बसेस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकाचे ओरडे खावे लागतात. अनेक ठिकाणी तर गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिलेल्या आहेत. याचा विपरीत परिणाम म्हणून काय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत.
बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे, तांत्रिक बिघाडामुळे बस नादुरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत घ्यावी. या हेतूने १८००२२१२५१ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. तरी या क्रमांकावर विद्यार्थी - विद्यार्थ्यांनींनी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देता येईल. असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
तसेच ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दूरध्वनी संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येत आहेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकतात.