

Maharashtra Board Exam
कोल्हापूर: फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षा आता पूर्णपणे सीसीटीव्हीच्या देखरेखीखालीच आयोजित होणार आहेत. परीक्षा केंद्रांवर १०० % सीसीटीव्ही सुविधा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे कोल्हापूर विभागीय बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.२३) सांगितले.
जर कोणत्याही परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही सुविधेचा अभाव आढळला तर त्या शाळेची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अतिग्रे येथील संजय घोडावत जुनिअर कॉलेज येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभाग आणि जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित बोर्ड परीक्षा पूर्वतयारी मुख्याध्यापक सहविचार सभेत ते बोलत होते.
राजेश क्षीरसागर म्हणाले की, परीक्षा व्यवस्थेत प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. शासनाच्या विविध सुध्दा योजना कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या रितीने राबल्या जात आहेत. शाळांमध्ये भौतिक सुविधांवर व्यावसायिक दृष्टिकोनातून काम केल्यास समाजातील स्थान अधिक बळकट होते. शिक्षकांनी भयमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तर लेखनाचा नियमित सराव करून द्यावा.
कॉपीमुक्त अभियान हा यंदाचा जिल्हा दक्षता समितीचा मुख्य अजेंडा आहे. पालकांना परीक्षेबद्दल योग्य माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गांचा वापर किंवा कॉपीवर अवलंबून न राहण्याची शपथ घ्यावी.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी सांगितले की, राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कॉपीमुक्त अभियान व्यवस्थितपणे राबवले जात आहे. सीसीटीव्ही अनिवार्य केले असतानाही शासनाकडून जेवढी मदत मिळू शकते, ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, दोन दिवसांत संचमान्यता डाटा फॉरवर्ड करा, यूडायस (UDISE) नोंदी पूर्ण करा, व्हीएसके अॅपवर विद्यार्थी उपस्थिती नोंदवा, विद्यार्थी सुरक्षा प्रश्नावली पूर्ण करा आणि पाठवा, १०० % आधार व्हॅलिडेशन आणि अपार आयडी काम पूर्ण करा,
सभेला प्राचार्य गिरी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, बोर्डाचे सहसचिव किल्लेदार श्री उकीरडे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले, अजय पाटील, हनुमंत बिराजदार, विस्तार अधिकारी धनाजी पाटील, जयश्री जाधव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.