शिरोली एमआयडीसी : शिये येथील १० वर्षीय परप्रांतीय चिमुरडीवर तिच्याच नात्यातील मामाने अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केला होता. या प्रकरणात आणखी एका परप्रांतीय तरूणाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. राहूल कुमार (वय १९, रा. मुळ गाव बिहार सध्या. शिये ता. करवीर) असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
शिये येथे बुधवारी २१ ऑगस्टला दुपारपासून परप्रांतीय १० वर्षीय चिमुरडी बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती . पोलीस पथकाने श्वानासह परिसरात धाव घेत मुलीचा शोध घेतला. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या चिमुरडीच्या नात्यातील नराधम मामा दिनेशकुमार केशनाथ साह (25, सध्या रा. रामनगर शिये, मूळ बिहार) याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबूली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यानुसार पोलिसानी पोलिस कोठडीत त्याकडे अधिक चौकशी केली असता त्यातून आणखीन एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. या खूनप्रकारणी गुन्ह्याची व्याप्ती वाढत चालली आहे. दिनेश कुमारला सहकार्य करण्याचे काम राहुल कुमार याने केले असून सोमवारी (दि.२६) पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास करवीर विभागीय पोलीस अधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.