

Shivajirao Patil support rally Gadhinglaj on Shaktipith
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग चंदगड मार्गे जावा, अशी मागणी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली होती. त्यानंतर विरोधकांनी पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत गडहिंग्लज येथील दसरा चौकात आंदोलन केले होते. दरम्यान, आज (दि.१४) आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज येथे शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ पदयात्रा काढण्यात आली. शहरातल्या मुख्य मार्गावरून हातात फलक घेऊन ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विरोधकांचा निषेध करण्यात आला.
यावेळी आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले की, समृद्धी महामार्गाला सुद्धा अनेकांनी विरोध केला होता. मात्र, आता आपण पाहतोय समृद्धी महामार्गामुळे दळणवळण सोपं झालं आहे. मराठवाड्याला सुद्धा याचा किती मोठा फायदा झाला आहे. तसाच शक्तीपीठ महामार्गामुळे मोठा विकास होणार आहे. आमच्या या भागात आजपर्यंत म्हणावा तसा विकास झालेला नाही.
आजचे आमचे आंदोलन किंवा मोर्चा नाही, मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ ही रॅली आहे. आमच्याकडे पर्यटन वाढावे आणि अनेक तरुणांना रोजगार या माध्यमातून मिळावा, अशी आमची इच्छा आहे. चंदगडपासून गोवा आणि बेळगावजवळ आहे. ते विकसित झाले आहे. मात्र, चंदगड मध्ये सुद्धा विकास व्हावा, अशी आमची इच्छा आहे.
विरोधक विरोध करत राहतील त्यांचे ते काम आहे. मात्र आजच्या मोर्चात शेतकरी आणि भाजपचे कार्यकर्ते, सर्वसामान्य लोक, महाविद्यालयीन तरुण सहभागी झाले आहेत. या सर्वांना माहीत आहे. आपल्या भागाचा विकास झालेला नाही. निदान या महामार्गामुळे विकासाला गती येईल, असा त्यांना विश्वास वाटू लागला आहे. जेव्हा हा महामार्ग होईल, त्यानंतर विरोधक तोंडात बोट घालतील.
काँग्रेस नेते व माजी मंत्री सतेज पाटील हे विरोधी गटातील नेते आहेत. मात्र, त्यांनाही माहित आहे. या भागाला विकास हवा आहे. त्यामुळे त्यांचे काही जास्त मनावर घेऊ नका. ते सुद्धा महामार्ग झाल्यावर सरकारचे अभिनंदन करतील. कोण राजू शेट्टी? ते काय होते, आज त्यांचेच सहकारी त्यांच्यासोबत आहेत का ?त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीवेळी त्यांचे कार्यकर्ते कारखानदारांसोबत होते. त्यांच्या याच स्वभामुळे त्यांचे कार्यकर्ते सोडून गेले आहेत, अशी टीका आमदार पाटील यांनी केली आहे.