

मुंबई: कोल्हापूर खंडपीठ मागणीला सकारात्मक पाठिंबा आहे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबई येथील भेटीदरम्यान केले, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची गव्हर्मेंट लॉ कॉलेज, मुंबई येथे नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेसाठी औपचारिक मागणीपत्र त्यांच्या हातात दिले. यावर गवई यांनी, मी गेली 5 वर्षे कोल्हापूर खंडपीठाच्या बाजूने आहे, असे सांगितले. त्यांच्या या विधानाने कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांना अधिक बळ प्राप्त झाले आहे.
याप्रसंगी सरन्यायाधीशांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित 52व्या शेठ वालचंद स्मृती व्याख्यानासाठी आमंत्रण दिले. त्यांना यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या शतक महोत्सवाचे विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, न्यायमूर्ती मनीष पितळे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, लॉ कॉलेज प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य, हर्ष सकलेचा आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने कोल्हापूर खंडपीठाच्या न्याय मागणीसाठी असलेला आपला पाठिंबा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन ललित गांधी यांनी केले आहे.