

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळी सहा आमदार असताना देखील मंत्रिपद मिळाले नव्हते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादामुळेच शिवसेनेला (Shiv Sena) पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिली. मंत्री झाल्यानंतर ते कोल्हापुरात पहिल्यांदाच दाखल झाले. त्यानंतर त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मंत्रि म्हणून मला चांगली संधी मिळालेली आहे. या संधीचे सोनं करण्याची जबाबदारी माझी आहे. कोल्हापूरकरांनी शिवसेनेला भरभरून दिले आहे. एकेकाळी सहा आमदार आणि दोन खासदार दिले होते. परंतु, त्या तुलनेत कोल्हापूरला शिवसेनेने काहीच दिले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरला मंत्रिपद दिले. यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिकांना अधिक बळ मिळणार आहे.
काळम्मावाडी धरणाच्या गळती संदर्भातील काम करण्यासाठी टेंडर फायनल झालेले आहे. काही त्रुटी आहेत. त्या आज अधिकाऱ्यांना भेटून पूर्ण केल्या जातील. धरणाची गळती काढण्याचे काम जलद गतीने केले जाईल, त्याची जबाबदारी मंत्री म्हणून आमची असेल.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाबाबत पक्षाचे तिन्ही नेते जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. असे त्यांनी स्पष्ट केले. शक्तिपीठ महामार्ग आपल्या जिल्ह्यातून देखील व्हावा, यासाठी पुढाकार घेणारा मी पहिला आमदार होतो. मात्र, आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. विकास होत असताना आपल्या माणसाचे नुकसान होऊ नये, याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे. त्यामुळेच कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला आहे.