कोल्हापूर : जन्मठेप भोगणार्‍या कैद्याचे कळंबा जेलमधून पलायन

शहर, जिल्ह्यात शोधमोहीम; शेत बंधार्‍यावरून पळाला
Kolhapur Crime News
जन्मठेप भोगणार्‍या कैद्याचे कळंबा जेलमधून पलायन केले.
Published on
Updated on

कोल्हापूर : धुळे जिल्ह्यातील फाळनेर येथील खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगणार्‍या कैद्याने कळंबा मध्यवर्ती कारागृहांतर्गत ओपन जेलमधून सुरक्षारक्षकांची नजर चुकवून शुक्रवारी पलायन केले. वजीर नानसिंग बारोला (41, रा. फाळनेर, धुळे) असे त्याचे नाव आहे. त्याच्या शोधासाठी शहर व जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली. मध्यवर्ती बस, रेल्वे स्थानकासह बाजारपेठांत शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र रात्रीपर्यंत सुगावा लागला नव्हता.

जुना राजवाडा पोलिस व कळंबा कारागृह प्रशासनाने सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यासह धुळे व मध्य प्रदेश पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून बारोला याची माहिती व वर्णन दिले आहे. रेल्वे पोलिसांनाही सतर्क करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. मूळचा मध्य प्रदेश येथील वजीर बारोला याला 2017 मध्ये फाळनेरमधील खूनप्रकरणी अटक झाली. 30 नोव्हेंबर 2018 रोजी त्यास न्यायालयाने आजन्म कारावास सुनावला.

नाशिक कारागृहातून 18 जुूलै 2024 रोजी त्याला कोल्हापुरतील कळंबा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. एकूण शिक्षेपैकी 5 वर्षांचा कारावास भोगल्याने कारागृहांतर्गत ओपन जेलमधील गोठ्यातील जनावरांच्या देखभालीची त्याच्याकडे ड्युटी होती. सहकारी कैदी लहू विजय नाईक याच्यासमवेत कैदी बारोला शेताच्या बांधावर सकाळी 11.45 पर्यंत काम करीत होता. त्यानंतर त्याने लघुशंकेसाठी जात असल्याचे नाईक याला सांगितले. अंगावरील कपडे बदलून जनावराच्या गोठ्याजवळ ठेवले व पलायन केले. अर्ध्या तासानंतरही सहकारी कैदी परतला नसल्याने नाईक याने कारागृह रक्षकांना माहिती दिली. अधिकार्‍यांसह सुरक्षा रक्षकांनी त्याची शोधाशोध केली. मात्र सुगावा लागला नाही. कारावास भोगणार्‍या कैद्याने पलायन केल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना देण्यात आली. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी कळंबा कारागृहास भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी कारागृहाचा सारा परिसर पिंजून काढला. शेंडा पार्क, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगावसह परिसरातही शोध घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news