

Shiroli MIDC Son Kills Father
नागाव: वडिलांचा खून करायचा, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकायचा आणि स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन वडील बेपत्ता असल्याची खोटी तक्रार नोंदवायची... चित्रपटालाही लाजवेल असा हा खळबळजनक कट रचणाऱ्या पोटच्या मुलाचाच डाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलटवून लावला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शिरोली एमआयडीसी परिसरातील या थरारक खून प्रकरणाचा छडा लावत मुलासह त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणात रेहान फिरोज मुजावर (मुलगा) आणि त्याचा मित्र पीरपाशा दुलाल जहांगीरदार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज खानसो मुजावर (वय ४४) असे खून झालेल्या दुर्दैवी बापाचे नाव आहे.
२९ मे: फिरोज मुजावर हे अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा रेहान याने स्वतः शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.
२ जून: शिरोली परिसरातील एका शेतातील विहिरीमध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याचे समोर आले. मृतदेह फिरोज मुजावर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळापासून ते मृत व्यक्तीच्या घरापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक पुरावे आणि नातेवाईकांच्या चौकशी दरम्यान पोलिसांना फिर्यादी मुलगा रेहान याच्याच हालचालींवर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मित्राच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली.
मयत फिरोज मुजावर हे सतत मद्यप्राशन करून घरातील कुटुंबीयांना प्रचंड त्रास देत होते. रोजच्या या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या मुलाच्या मनात वडिलांबद्दल तीव्र राग होता. याच रागातून रेहानने वडिलांचा 'गेम' करण्याचा भयानक कट रचला.
२९ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास रेहान आणि त्याच्या मित्राने फिरोज यांना घराच्या मागे नेले. तिथे धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यावर स वार करून त्यांना संपवले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी मृतदेह मोटारसायकलवर मधी टाकून नेला आणि शेतातील विहिरीत फेकून दिला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रेहानने स्वतःच पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली होती.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास अत्यंत वेगाने करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, अमित पांडे, संदीप पाटील, रामचंद्र कोळी, महेश अंबी, महेश खोत, वसंत पिंगळे, नजीर शेख, सुहास संगपाळ आणि निलेश कांबळे यांच्या पथकाने केवळ २४ तासांत या अंधाऱ्या गुन्ह्यावरून पडदा उचलला.