

Shiroli MIDC Chemical Water Issues
शिरोली पुलाची : शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातून सोडण्यात आलेले केमिकलयुक्त पाणी प्याल्याने पाच मेंढरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाटील यांच्या मालकीच्या इंद्रायणी कंपनीतून सोडण्यात आलेले हे पाणी मेंढरांनी प्यायल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर संबंधित कारखानदाराने मेंढपाळाला ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन प्रकरण मिटविले.
मृत झालेली मेंढरे बाळूमामा मंदिर परिसरात राहणारे संजय गंगाराम गावडे यांच्या मालकीची होती. पाच मेंढरांचा मृत्यू झाल्याने गावडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शिरोली ग्रामपंचायतीचे कृष्णात करपे, प्रकाश कौंदाडे, योगेश खवरे आणि राहुल अष्टेकर यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नानंतर संबंधित कारखानदाराने गावडे यांना ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली.
या घटनेमुळे शिरोली औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांमधून केमिकलयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा सांडपाण्यामुळे पशुधनाच्या जीविताला धोका निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याची तपासणी करावी, अशी मागणी नागरिक आणि पशुपालकांकडून होत आहे. सांडपाणी सोडण्यावर प्रभावी नियंत्रण ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखानदारांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.