

Pune Bengaluru Highway Car Crash
नागाव : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी परिसरातील विवेक ट्रेलर कंपनीसमोर बुधवारी (दि.१९) पहाटे तीनच्या सुमारास कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वल्लभ संजय माने (रा. भादोले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महमंदखॉजा अब्दुलसत्तार कडगी (वय २५, रा. कोकरे गल्ली, निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक) हा कार घेऊन भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे प्रवास करत होता. शिरोली एमआयडीसीतील विवेक ट्रेलर कंपनीसमोर त्याने पुढे जात असलेल्या वल्लभ माने यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडकेनंतर वल्लभ माने रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
वल्लभ माने हे शिरोली एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत होते. काम आटोपून ते आपल्या भादोले येथील गावी निघाले असताना हा दुर्दैवी अपघात घडला. वल्लभ हे अविवाहित आणि कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच भादोले गावावर शोककळा पसरली.
या प्रकरणी अभिजित कृष्णात माने (वय ४३, रा. भादोले, ता. हातकणंगले) यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून कारचालक महमंदखॉजा कडगी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू आहे.