

Kolhapur Shiroli Gram Panchayat Notice
शिरोली पुलाची : मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यातून जवळपास ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यातून पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली. या गोष्टींचा विचार करून सतर्कतेचा इशारा म्हणून गावातील पूर बाधित क्षेत्रातील जवळपास ५२९ कुटुंबांना शिरोली ग्रामपंचायतीने स्थलांतरित होण्याच्या नोटिसा लागू केल्या आहेत.
सध्या पावसाचा जोर वाढत असून जिल्ह्यातील ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीचे पाण्याची पातळी वाढून पाणी पात्राबाहेर पडले आहे. संभाव्य वाढत्या पाण्याचा धोका विचारात घेऊन शिरोली ग्रामपंचायत तर्फे सरपंच पद्मजा करपे, ग्रामविकास अधिकारी गीता माळी, माजी उपसरपंच कृष्णात करपे, ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार यांनी गावात ज्या ठिकाणी पाणी येते. तसेच २०१९ व २०२१ मध्ये पूर काळातील पूर बाधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथे राहणाऱ्या ५२९ कुटुंबातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावून सतर्कतेचा इशारा दिला.
या स्थलांतरित लोकांसाठी सात ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्जेराव पाटील, हरी वंडकर, महेश सावंत, नितीन परमाज, कुणाल यादव आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.