

Shirol Shirdhon School Liquor Den
बिरू व्हसपटे
शिरढोण : शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील जिल्हा परिषद कुमार विद्यामंदिर शाळा सध्या मद्यपींच्या विळख्यात सापडली असून शिक्षणाचे मंदिरच मद्यपींचा अड्डा बनल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या शाळेला सुट्टी असल्याचा गैरफायदा घेत रात्रीच्या वेळी काही मद्यपी शाळेच्या आवारात प्रवेश करून खुलेआम नशाबाजी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शाळेच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, बिसलेरी बाटल्या तसेच गुटख्याच्या पुड्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. वाढलेल्या झाडाझुडपांचा आधार घेत मद्यपी रात्रीच्या अंधारात शाळेच्या गेटवरून उड्या मारून आत प्रवेश करतात, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे.
याशिवाय शाळेत लावलेल्या झाडांची मोडतोड, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उभारलेल्या मंडपाची नासधूस तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचेही नुकसान करण्यात आल्याचे समोर आले आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचे ढीग साचल्याने पालक आणि नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
गावात दारूबंदी असताना दारू उपलब्ध कशी होते? याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष का करत आहे? असे सवाल उपस्थित होत असून कुरुंदवाड पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.