

शिरढोण : शिरढोण गावचे सरपंच सागर भंडारे यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचा बनाव करून शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांची दिशाभूल केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करीत ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांनी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सरपंच सागर भंडारे यांनी ७ ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सदर राजीनामा अवलोकनासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीनिशी पुढे पाठविण्यात आला आहे. राजीनाम्याच्या अर्जावर सरपंच भंडारे यांची सही तसेच दोन साक्षीदारांच्या सह्याही असून त्याचे फोटो पुरावे उपलब्ध आहेत. असे असतानाही केवळ स्वार्थासाठी आपण राजीनामा दिलाच नसल्याचा बनाव करण्यात येत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
राजीनाम्यानंतर सहीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नेमका कोणाचा, याबाबत ग्रामसेवक व गटविकास अधिकारी लेखी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली आहे.
दरम्यान, गावातील नागरिकांना ५० टक्के करसवलत मिळावी, ही आमची ठाम भूमिका असून गावसभा घेण्यास आमचा कोणताही विरोध नाही. त्यामुळे ग्रामस्थांची दिशाभूल करणे थांबवावे, अशी मागणी सदस्य भास्कर कुंभार, रवी कांबळे, शर्मिला टाकवडे, रेश्मा चौधरी, भारती मगदूम, अनिता मोरडे, आरिफ मुजावर, संगीता मगदूम, शक्ती पाटील यांनी केली आहे.