

ZP School Sanitation
शिरढोण : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी शिरोळ पंचायत समितीने आठवड्यातून दोन दिवस शाळांची नियमित स्वच्छता करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मात्र, तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडून या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. शिरढोण, जांभळीसह अनेक गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून, काही ठिकाणी प्रत्यक्ष काम न करता केवळ कागदोपत्री स्वच्छता झाल्याच्या नोंदी दाखवल्या जात असल्याची चर्चा आहे.
पंचायत समितीच्या आदेशानुसार प्रत्येक सोमवार आणि गुरुवार सकाळी ९ ते १० या वेळेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शाळांची स्वच्छता करणे बंधनकारक आहे. तसेच स्वच्छतेसाठी लागणारा खर्च ग्रामपंचायतीच्या निधीतून करावा आणि प्रत्येक महिन्याच्या २ तारखेपर्यंत स्वच्छतेचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायतींनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
शिरढोण, जांभळी आणि परिसरातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या आवारात गवत वाढलेले असून कचरा साचलेला आहे. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई होत नसल्याने विद्यार्थ्यांना अस्वच्छ वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे. काही ठिकाणी केवळ अहवाल पूर्ण करण्यापुरती कागदोपत्री स्वच्छता दाखविली जात असल्याची चर्चा असून, प्रत्यक्ष परिस्थिती मात्र त्यापेक्षा वेगळी असल्याची तक्रार पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने केवळ कागदोपत्री अहवालांवर विसंबून न राहता संबंधित शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी, आदेशाचे पालन न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर योग्य ती कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
शाळांची आठवड्यातून दोन वेळा स्वच्छता करून त्याचा मासिक अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, अनेक गावांमध्ये या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी केवळ कागदोपत्री स्वच्छता दाखविली जात असल्याची चर्चा असल्याने पंचायत समितीने प्रत्यक्ष पाहणी करून सत्यस्थिती तपासावी, अशी मागणी जोर धरत आहे.