

Shirol Youth Drowns in Krishna River
कवठेगुलंद : गौरवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीत पोहताना दम लागल्याने एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अब्दुलरजाक मुस्ताक मोमीन (रा.इस्लामपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. ही दुर्घटना आज (दि.१७) दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गौरवाड येथील पाहुण्याच्या लग्नकार्यासाठी इस्लामपूर येथील काही पाहुणे आले आहेत. यातील काही युवक आज दुपारी एकच्या सुमारास कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेले होते. यातील अब्दुलरजाक याला पाण्याचा अंदाज न आल्याने पोहताना दम लागला व तो बुडला. हे समजताच काठावर असलेल्या त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी घाबरुन लगेच गौरवाडमधील पाहुण्याच्या घरी कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्स मागवून घेण्यात आली. त्यांनी तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर त्याला शोधून काढले. तोपर्यंत त्याचा पाण्यात घुटमळून मृत्यू झाला होता.
इस्लामपूरहुन गौरवाड येथे पाहुण्याच्या घरी लग्नकार्यासाठी आलेल्या तरुण युवकाचा पोहताना दम लागल्याने मृत्यु झाल्याने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.