

शिरढोण : इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी मजरेवाडी येथील कृष्णा नदीतून शिरढोणमार्गे टाकण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामातील निकृष्ट दर्जाचा कारभार आता उघड झाला आहे. जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्या योग्य पद्धतीने न भरल्यामुळे अनेक ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणात खचल्या असून रस्त्यालगत दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून इचलकरंजी महानगरपालिकेच्या कामकाजाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सुमारे बाराशे मीटर अंतरावरील जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर साईडपट्ट्या मजबूत करण्यासाठी जाड मुरूम, खडी व दगडांचा वापर करणे आवश्यक होते. मात्र संबंधित ठेकेदाराने खोदलेली मातीच पुन्हा भरल्याने पावसाच्या पाण्यामुळे ती वाहून गेली आणि अनेक ठिकाणी साईडपट्ट्या अर्धा फूटापर्यंत खचल्या आहेत. परिणामी रस्त्याच्या कडेला चिखल व दलदल निर्माण झाली असून वाहने रुतण्याचे प्रकार घडत आहेत.
या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, पालक, शेतकरी तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. साईडपट्ट्या खचल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या निकृष्ट कामाबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
इचलकरंजी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच साईडपट्ट्या जाड मुरूम, खडी व दगड टाकून दर्जेदार पद्धतीने तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जलवाहिनीच्या पुढील कामांना विरोध करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिरढोण ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन याची कितपत गांभीर्याने दखल घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.