

Shirdhon Gram Panchayat
शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीत तत्कालीन ग्रामसेवक विनायक शेवरे यांना ग्रामस्थ व चौकशी पथकातील अधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. चौकशी सुरू असतानाच अपूर्ण प्रोसिडिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तापले आणि शेवरे यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली.
सहायक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे यांच्या अध्यक्षतेखाली सात अधिकाऱ्यांचे पथक दिवसभर ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडून बसले होते. गेल्या चार वर्षांतील कारभाराची विभागनिहाय कागदपत्र तपासणी सुरू असताना २०२४-२५ या वर्षातील अपूर्ण प्रोसिडिंग शेवरे हे कार्यालयात बसून पूर्ण करत असल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले.
यावर अविनाश पाटील, विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे, पप्पू कुगे, अशोक मगदूम यांनी जाब विचारत तीव्र आक्षेप घेतला. काही काळ तणाव निर्माण झाला. हा प्रकार चौकशी समितीच्या लक्षात येताच अधिकाऱ्यांनी शेवरे यांना थेट प्रश्न विचारून जाब घेतला. अखेर समितीने संबंधित प्रोसिडिंग ताब्यात घेत शेवरे यांना कार्यालयाबाहेर काढले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या बांधकाम, शिक्षण व महिला-बालविकास विभागात बोगस खर्च दाखवून आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी सर्वपक्षीय कृती समितीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी ही चौकशी समिती नेमली आहे. प्राथमिक तपासणीत अनेक संशयास्पद बाबी समोर आल्याचे संकेत असून अंतिम अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
चौकशीदरम्यान गेल्या चार वर्षांतील ग्रामपंचायतीच्या विभागनिहाय खर्चात अनेक ठिकाणी विसंगती असल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत. अपूर्ण प्रोसिडिंग पूर्ण करण्याचा करण्यात आलेला प्रयत्न संशय निर्माण करणारा असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. बांधकाम तसेच महिला व बालविकास विभागातील खर्चाबाबत गंभीर अनियमितता झाल्याचे संकेत समितीच्या निदर्शनास आले आहेत. या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे चौकशी समितीने ताब्यात घेतली असून अंतिम अहवालातून अधिक स्पष्ट बाबी समोर येण्याची शक्यता आहे.