

चंदगड : पाटणे (ता. चंदगड) वनपरिक्षेत्रामध्ये येणाऱ्या चिंचणे, कामेवाडी जंगलामध्ये सौंदत्ती (जि. बेळगाव) तालुक्यातील रहिवासी व चंदगड तालुक्यात लाकूड तोडीचा व्यवसाय करणाऱ्या दोन शिकाऱ्यांना वन खात्याने सोमवारी सायंकाळी अटक केली. यामध्ये बसाप्पा निंगाप्पा देवरमणी (वय 50) व सुरेश बसाप्पा देवरमणी (वय 25, दोघेही रा. बुदनूर, ता. सौंदत्ती, जिल्हा बेळगाव) यांचा समावेश आहे. त्यांनी वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात एकूण सात सापळे लावले होते. यावेळी त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 7 जाळी, कोयता, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पाटणे वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल शितल पाटील, वनपाल जॉन्सन डिसोजा यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने सदर कारवाई केली अधिक तपास सुरू आहे. संशयित आरोपींना चंदगड न्यायालयाने तीन दिवसांची वन कोठडी दिली आहे.