

शिरोली एमआयडीसी: पुढारी वृत्तसेवा : शिये फाटा ते भुये, तसेच क्षेत्र जोतिबाकडे जाणाऱ्या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. याबाबतचे वृत्त 'दैनिक पुढारी'ने सचित्र प्रसिद्ध केले होते. त्या वृत्तात शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज (दि. ६) या रस्त्यावर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उतरले व जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. या रस्त्यावरील खड्डात वृक्षारोपण करत शासकीय यंत्रणेचा निषेध केला. आंदोलनामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
शिये ते भुये क्षेत्र जोतिबाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर वाळू मिश्रित पाणी अखंडपणे येत असल्याने रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचून राहिल्याने लोकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने खड्ड्यांत जाऊन अपघात घडत आहेत.
पाटील मळा येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. जोतिबाची यात्रा व शिये यात्रा ही जवळ आलेली असताना रस्त्याची दुरुस्ती करून घेणे अत्यंत गरजेचे होते. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरला या रस्त्याची देखभाल दुरुस्ती दिलेली आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. शनिवारी या रस्त्यावर दोन ट्रकचे टायर फुटले. तर एका छोटा हत्तीची कमान पट्टी तुटली. चार दिवसांपूर्वी 'दैनिक पुढारी'ने याप्रश्नी सविस्तर वृत्त देऊन याकडे लक्ष वेधले होते. तर याप्रश्नी शेतकरी संघटनेचे अॅड. माणिक शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यमार्ग क्रमांक 194 शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले. यावेळी बाबासो गोसावी, उत्तम पाटील, भगवान शिंदे, सुरेश पाटील, जयराम पाटील, राजू मगदूम आदीसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा