कोल्हापूर : तळपत्या उन्हात अंबाबाई भक्तांच्या पायांना चटके | पुढारी

कोल्हापूर : तळपत्या उन्हात अंबाबाई भक्तांच्या पायांना चटके

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापुरात सध्या उन्हाचा पारा चाळिशीला टेकतो आहे. येत्या दोन महिन्यांत कडक उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. या स्थितीत अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची त्रेधातिरपीट उडत आहे. या भाविकांना रस्त्यांवरून चालताना तापलेल्या तव्यावर पाय ठेवण्याचा अनुभव घ्यावा लागतोे. साहजिकच मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी उड्या मारत पळत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी मंदिराकडे येणार्‍या चारही मार्गांवर अर्धा किलोमीटर लांबीचे काथ्याचे कार्पेट टाकण्याची गरज आहे. याखेरीज संबंधित रस्त्यांवर उन्हाच्या तिरपीपासून वाचविण्यासाठी मंडपही उभारता येणे शक्य आहे. देवस्थान समितीसाठी तर ही सहज करता येण्याजोगी बाब आहे; पण दुर्दैवाने याकडे प्रशासन लक्ष देत नाही आणि भाविकांचे पाय पोळणे मात्र सुरू आहे.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवेशद्वारावर पादत्राणे ठेवण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नाही म्हणून भाविक निवासाच्या ठिकाणीच पादत्राणे ठेवतात व पायांना चटके सहन होत नसल्याने तापलेल्या रस्त्यांवरून उड्या मारत मंदिरात प्रवेश करतात. वृद्धांचे हाल तर बघवत नाहीत. स्वच्छतागृहांचा तर पत्ताच नाही. पार्किंगची व्यवस्था अपुरी असल्याने रस्त्याकडेला मोकळी जागा दिसताच गाडी पार्क केली तर पोलिस पावती फाडण्यासाठी टपून बसलेले असतात किंवा गाडी उचलून नेली जाते. भांबावलेले भाविक गाडीची शोधाशोध सुरू करतात. सर्व सुविधांसाठी भाविकांची पैसे मोजण्याची तयारी आहे; पण मोफत सेवेच्या भावनेत अडकल्यामुळे सुविधाही नाहीत आणि महसूलही नाही, अशी अवस्था आहे. खरे तर या तीर्थक्षेत्राच्या पर्यटनामध्ये शेकडो कोटींच्या उलाढालीची क्षमता आहे; पण ही क्षमता राजकारण्यांना आणि प्रशासनाला उमगणार कधी, हाच कळीचा मुद्दा आहे, कारण कोल्हापूरच्या विकासाचे एक मोठे स्वप्न त्यामध्ये अडकले आहे.

देशातील अनेक पर्यटनस्थळांवर देवस्थानातून मिळालेल्या उत्पन्नाचा भाविकांच्या सोयीसाठी उपयोग केला जातो. तिरुपती येथे दर्शन मार्गावर थंड पाण्यासह कूलरचीही व्यवस्था आहे. पादत्राणांची निःशुल्क सेवा उपलब्ध आहे. पायांना चटके बसू नयेत म्हणून विशिष्ट प्रकारचा दगड वापरून मंदिराकडे येणारे सर्व रस्ते तयार केले आहेत. कोल्हापुरात जर दररोज भाविकांची संख्या 50 हजारांचा, सुट्ट्यांच्या दिवशी लाखाचा आणि नवरात्रोत्सवात दीड लाखाचा आकडा ओलांडत असेल, तर देवस्थान समितीला या सुविधा द्याव्याशा का वाटत नाहीत? की दानपेट्या उघडून त्याच्या मुदतबंद ठेवी करण्यामध्ये देवस्थानला रस आहे, याचे उत्तर द्यावे लागणार आहे. तरुण आणि मध्यमवयीन तापलेल्या डांबरी रस्त्यांवरून उड्या मारत मंदिरापर्यंत पोहोचू शकतात; पण ज्येष्ठ नागरिकांनी कसे पोहोचायचे, हा मोठा मुद्दा आहे. कारण, त्यांचीही संख्या लक्षणीय आहे.

मंदिर परिसराच्या परिघाबाहेर स्वच्छतागृहांची अनुपलब्धता हा आणखी एक गंभीर मुद्दा आहे. महिलांसाठी तर तो त्याहून गंभीर आहे. देवस्थान समितीने मंदिर परिसराच्या परिघात काही ठिकाणी ही सुविधा उपलब्ध केली खरी; पण ती इतकी तोकडी आहे की, परिघाबाहेर भाविकांना यातनांना सामोरे जावे लागते. कोल्हापूर शहराचा तीर्थक्षेत्र विकास केव्हा व्हायचा तेव्हा होवो. 40 वर्षे नागरिक या तीर्थक्षेत्राच्या घोषणेचे स्वप्नरंजन करताहेत; परंतु किमान नागरिकांच्या पायाला बसणारे चटके तरी वाचवा, अशी आर्त हाक घालण्याची वेळ आली आहे. जर प्रशासन जागे होणार नसेल, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यामध्ये पुढाकार घेण्यास हरकत नाही; कारण दोन-चार डॉल्बीच्या भाड्यांमध्ये अशी कार्पेट बसविण्याचे काम सुरू होऊ शकते.

Back to top button