Kolhapur News : …तर शेतकरी संघाच्या इमारतीबाबत फेरविचार : जिल्हाधिकारी रेखावार

Kolhapur News :  …तर शेतकरी संघाच्या इमारतीबाबत फेरविचार : जिल्हाधिकारी रेखावार
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  श्री अंबाबाईच्या दर्शनाला येणार्‍या भाविकांसाठी शेतकरी संघाच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असतील, तर तसा प्रस्ताव द्यावा. त्यानंतर इमारत ताब्यात घेण्याबाबतच्या आदेशाचा फेरविचार करू, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले. यावेळी आदेश मागे घेण्यावरून विजय देवणे आणि जिल्हाधिकारी रेखावार यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमक उडाली.

शेतकरी संघ बचाव सर्वपक्षीय कृती समितीचा मोर्चा झाल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रेखावार यांच्याशी चर्चा केली. संघाच्या अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई म्हणाले, संघाबरोबर कोणतीही चर्चा न करता चुकीच्या पद्धतीने आदेश काढून संघाची इमारत ताब्यात घेतली आहे. सभासद संघाचे मालक असून, त्यांच्या मान्यतेशिवाय संघ प्रशासन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. याबाबत कायदेशीर मार्गदर्शनही घ्यावे लागेल. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, आदेश मागे न घेतल्यास सोमवारपासून तीव— आंदोलन करू. इमारत ताब्यात घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. यापूर्वी येथे अशी कोणती आपत्ती घडली होती, असा सवाल अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केला.

यावर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, नवरात्रौत्सवामध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात अन्यत्र जागा नसल्यामुळे दर्शन रांगेसाठी तात्पुरत्या स्वरूपात संघाची जागा अधिग्रहण केली आहे. कायमस्वरूपी इमारत ताब्यात घेतलेली नाही. जेवढे दिवस वापर होईल, त्या कालावधीचे भाडे देण्यात येणार आहे. चुकीच्या पद्धतीने काढलेला आदेश मागे घेणार की नाही ते सांगा; अन्यथा पुढील निर्णय आम्ही घेऊ, असे विजय देवणे म्हणाले. यावर जिल्हाधिकारी रेखावार आणि देवणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तुम्ही असेच बोलणार असाल, तर मला चर्चा करावयाची नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

भाविकांना सुविधा देण्याकरिता संघही पुढाकार घेईल. मात्र, त्यासाठी येणारा खर्च देवस्थानने करावा, असे अशासकीय मंडळाचे सदस्य अजितसिंह मोहिते यांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, संघाकडून तसा प्रस्ताव द्यावा, तो प्रस्ताव पाहून पुढील निर्णय दिला जाईल. त्यानंतर संघ प्रशासन व शिष्टमंडळाने दोन दिवसांत प्रस्ताव देण्याचे मान्य केले.

यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख सुनील मोदी, माजी संचालक व्यंकाप्पा भोसले, कॉ. उदय नारकर, भारती पोवार, शिवाजीराव परुळेकर, बाबासो देवकर, वसंतराव मुळीक आदींनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news