

कोल्हापुरात सात वर्षांच्या चिमुरडीवर निर्घृण अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. कात्यायनी–दऱ्याचे वडगाव परिसरातील उसाच्या शेतात हा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून अनेक ठिकाणी शोध घेत अखेर सात तासांच्या प्रयत्नानंतर आरोपीला अटक केली. अटक केलेल्या संशयिताचे नाव विकास आनंदा कांबळे (वय 28) असे असून तो चिमुरडीच्या वडिलांचा ओळखीचा असल्याचे समोर आले आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पीडित चिमुरडी पाचगाव परिसरात राहत असून रविवारी दुपारी तिचे आई-वडील आणि नातेवाईक कात्यायनी रोडवरील एका हॉलमध्ये विवाह समारंभासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी पाहत आरोपी थेट चिमुरडीकडे आला. "बाळ चल, तुला वडिलांकडे सोडतो" असे सांगून त्याने तिला फसवले आणि सोबत नेले.
तो तिला घेऊन कात्यायनी–गिरगाव रोडवर आला. तिथे निर्जनस्थळी असलेल्या एका उसाच्या शेतात त्याने चिमुरडीवर घृणास्पद कृत्य केले. या अमानुष अत्याचारामुळे भेदरलेली चिमुरडी रडू लागली आणि आरडाओरडा करू लागली. त्यावर आरोपीने तिच्याच ड्रेसचा तुकडा बोळा म्हणून तोंडात कोंबला आणि तिला मारहाण करत अत्याचार सुरूच ठेवला. तरीही ती थांबली नाही, म्हणून त्याने तिला शेताबाहेर आणले.
चिमुरडी पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत होती. आरोपीने तिला धमकावत म्हटले, "कोणाला काही सांगितले तर तुझ्या वडिलांना ठार मारेन". त्यानंतर तो तिला घेऊन विवाहस्थळी परत आला. तिला वडिलांकडे दिले आणि क्षणात पसार झाला. सुरुवातीला वडिलांना काहीच समजले नाही. मात्र काही वेळाने चिमुरडीने टाहो फोडला. वडिलांनी तिच्या अंगावरील जखमा, कपड्यांवरील डाग पाहिले आणि धक्काच बसला. त्यांनी तातडीने तिला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मोठा मोहीम राबवली. अनेक बीअर बार, बंद पडलेली बांधकामे, आणि परिसरातील संशयित ठिकाणे तपासून अखेर या नराधमास अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.
घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधितावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चिमुरडीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपीने हा प्रकार कशा मानसिकतेतून केला, तसेच तो एकटाच होता की आणखी काही सहभागी होते, याचा तपास सुरू आहे.