

दत्तवाड – पुढारी वृत्तसेवा
दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीपात्रात सकाळी आंघोळीसाठी गेलेल्या इसमावर भल्या मोठ्या मगरीने हल्ला करून ठार केले. नदीपात्रातील मगरींचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
येथील केडीसी बँकेचे माजी कर्मचारी लक्ष्मण कलगी (वय 59) हे नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे सातच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यासह आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले होते. पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या पुढील भागात एका मोठ्या मगरीने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना पाण्यात ओढून नेले. मगर आणि कलगी यांच्यात झटापट सुरू असताना उपस्थितांनी आरडाओरडा केला.
थोड्याच वेळात गावभर ही बातमी पसरली. नागरिक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी एकत्रित आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर जवळपास तासाभराने मगरीने कलगी यांना सोडले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
मृतदेह पाण्यावर तरंगत असताना नागरिकांनी त्यांना नदीपात्रातून बाहेर काढले. त्यांच्या दोन्ही पायांवर मगरीच्या हल्ल्यामुळे खोल जखमा झाल्या होत्या. वनविभागाचे अधिकारी खामकर यांनी पंचनामा केला.
यापूर्वीही दत्तवाड येथे मगरींनी एक घोडा, एक रेडकू, शेळ्या-मेंढ्या तसेच अंघोळीसाठी गेलेल्या एका इसमावर हल्ला केला होता. नदीपात्रात वारंवार मगरींचा वावर दिसून येत होता. या संदर्भात प्रशासन आणि वनविभागाला अनेक वेळा सूचना करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. याकारणाने एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला असून, आता तरी प्रशासन व वनविभागाने जागे होऊन दूधगंगा नदीपात्रातील मगरींचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.