

Kolhapur Senapati Kapsi Teacher Assault
सेनापती कापशी : सेनापती कापशी (ता. कागल) येथील न्या. रानडे विद्यालयातील सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला (वय ५५) याच्यावर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप होताच पालकांचा संताप अनावर झाला. त्यांनी शाळेच्या आवारातच त्याला बेदम चोप दिला. या घटनेने संपूर्ण कापशी गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून बाजारपेठ बंद ठेवून ग्रामस्थांनी निषेध फेरी काढली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निसार मुल्ला हे न्या. रानडे विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थिनींबरोबर अश्लील बोलणे, आक्षेपार्ह वर्तन करणे, तसेच मानसिक त्रास देणे असे प्रकार सातत्याने घडत होते. अनेक विद्यार्थिनींनी हा त्रास पालकांना सांगितल्यानंतर अखेर पालकांनी शाळेवर धडक दिली.
मंगळवारी सकाळच्या सत्रात पालक मोठ्या संख्येने शाळेसमोर जमा झाले. पालकांनी थेट शाळेच्या आवारात घुसून मुल्ला यांना पकडून बेदम मारहाण केली. त्यांना शाळेच्या कार्यालयात लपविण्यात आले असता संतप्त पालकांनी तेथेही घुसून त्यांना चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निसार मुल्ला यांना ताब्यात घेतले. मात्र, पोलिस गाडीने त्यांना नेत असताना पालकांनी गाडी अडवून त्वरित कठोर कारवाईची मागणी केली. सहाय्यक पोलिस उपअधीक्षक ए. बी. पवार यांनी घटनास्थळी येऊन पालकांना कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर गाडी सोडण्यात आली.
पूर्वीही अशीच घटना
विशेष म्हणजे, यापूर्वीही निसार मुल्ला यांच्याविरुद्ध मुरगुड येथील शाळेत मुलीशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती. त्यावेळीही पालकांनी त्याला बेदम चोप दिला होता. त्या घटनेनंतर त्यांची बदली कापशी येथील रानडे विद्यालयात करण्यात आली होती. मात्र, तिथेही त्यांनी आपली विकृती सुरूच ठेवली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शाळा व्यवस्थापनाची तत्काळ कारवाई
या गंभीर घटनेनंतर शाळेच्या संस्थेने तातडीने पत्रक काढून निसार मुल्ला यांना बडतर्फ केल्याचे जाहीर केले आहे. संस्थेने पालकांची माफी मागून अशा शिक्षकांवर शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतल्याचे सांगितले आहे.
या घटनेनंतर कापशी गावात संतप्त वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ आणि पालकांनी निषेध फेरी काढून मुख्य बाजारपेठ बंद ठेवली. 'अशा विकृत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात थारा देऊ नये' अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू असून, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO Act) आणि इतर संबंधित कलमांखाली नोंद केली जाण्याची शक्यता आहे.