

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी अखेर माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा शहरप्रमुखपदी हर्षल सुर्वे यांची निवड झाली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी विशाल देवकुळे यांची निवड करण्यात आली. मुंबईत मातोश्रीवरून शुक्रवारी या निवडी जाहीर करण्यात आल्या. कोल्हापूर उत्तर शहरप्रमुख सुनील मोदी यांचे पद कायम ठेवण्यात आले आहे.
शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडे दोन पदे होती. त्यामुळे गेले काही दिवस जिल्हाप्रमुख बदलाच्या हालचाली सुरू होत्या. इंगवले यांच्यासह सुर्वे व अवधूत साळोखे हे इच्छुक होते. त्यापैकी कुणाची वर्णी लागते, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. अखेर इंगवले यांना पक्षश्रेष्ठींनी संधी देत त्यांना जिल्हाप्रमुख केले. इंगवले यांच्याकडे कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी असणार आहे. त्यांच्याकडे यापूर्वी दक्षिण शहरप्रमुखपदाची जबाबदारी होती. दरम्यान, निवडीनंतर इंगवले म्हणाले, पूर्वी जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार आणि सहा आमदार होते. तशीच शिवसेनेची पुन्हा ताकद निर्माण करू. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका ताकदीने लढवू.