

Sambave Crop Loss Kolhapur Rain Impact on Farming
विशाळगड : हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. सांबवे येथील शेतकरी पिंटू पाटील यांच्या मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी करून वाळवण्यासाठी ठेवलेल्या मक्याच्या कणसांना जागेवरच कोंब फुटले आहेत. यामुळे वर्षभराची बेगमी वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सांबवे येथील शेतकरी पिंटू पाटील यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला मका काढणी करून घराच्या छतावर वाळवण्यासाठी पसरून ठेवला होता. सलग आठ-दहा दिवस पडलेल्या पावसामुळे या मक्याच्या कणसांना जाग्यावरच कोंब फुटले आहेत. डोळ्यासमोर कष्टाचे पीक वाया जाताना पाहून शेतकरी बांधव खचून गेले आहेत.
मका हे कमी दिवसात चांगले उत्पन्न देणारे पीक मानले जाते. अनेक शेतकरी हे पीक वर्षभर खाण्यासाठी वापरतात, तर काही शेतकरी मका विकून आपल्या शेती उत्पन्नातून घराला हातभार लावतात. संततधार पावसामुळे मका पीक पूर्णपणे भिजले आहे. परिणामी, त्याला जाग्यावरच कोंब आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या नियोजनावर पाणी फिरले असून, त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
केवळ सांबवेच नव्हे, तर संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले जाते. काढणी योग्य झालेला मका मिळेल, त्या ठिकाणी वाळवण्यासाठी पसरून ठेवण्यात येतो. परंतु, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या या कष्टावर पाणी फिरवले आहे. सर्वत्र, मक्याला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र शाहूवाडी तालुक्यात दिसत आहे.