

Andolan Ankush News
शिरढोण : आंदोलन अंकुशने पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे. अर्जुनवाड ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे धनाजी चुडमुंगे व पदाधिकाऱ्यांनी टाकवडे, शिरढोण तसेच काळया ओढ्यालगतच्या दुर्गंधीयुक्त व रसायनमिश्रित पाण्याची पाहणी करत संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी केली.
नदीकाठावरील अनेक गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विना प्रक्रिया सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पाण्यातील ऑक्सिजन पातळी घटत असून मासेमृत्यू व शेती नापीक होण्याचे प्रकार वाढले आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळकडून केवळ ‘कारणे दाखवा’ नोटिसांचा पाढा वाचला जात असल्याचा आरोप करण्यात आला. प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने प्रदूषणमुक्तीचा प्रश्न अधिकच चिघळत आहे. लवकरच व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा ‘आंदोलन अंकुश’ने दिला आहे.यावेळी नागेश काळे,रशीद मुल्ला, मनोज चौगुले,अमोल गावडे, लक्ष्मण कांबळे, विजय काळे, शिवाजी काळे उपस्थित होते.
नदीकाठावरील गावांमध्ये नळाद्वारे मिळणारे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाण्याला दुर्गंधी येत असून रंग बदललेला दिसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्वचारोग, पोटाचे विकार आणि जनावरांनाही आजार वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.