कोल्हापूर : परजिल्ह्यातील सभासद करण्याच्या ठरावाला मंजुरी दिल्यास धुरांडे पेटू देणार नाही : नेजदार

कोल्हापूर : परजिल्ह्यातील सभासद करण्याच्या ठरावाला मंजुरी दिल्यास धुरांडे पेटू देणार नाही : नेजदार

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : "राजाराम साखर कारखान्याच्या एकूण सभासदांपैकी सुमारे साडेनऊ हजार सभासदांचा ऊस नेला जात नाही. शुक्रवारी होणाऱ्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमत अथवा भाडोत्री गुंडांच्या आधारे परजिल्ह्यातील सभासद करण्याच्या ठरावाला मंजुरी दिल्यास कारखान्याचे धुरांडे पेटू दिले जाणार नाही," असा इशारा माजी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

संबंधित बातम्या : 

राम सेवा संस्थेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. नेजदार पुढे म्हणाले, गुंडांच्या आधारे जर परजिल्ह्यातील सभासदांचा ठराव मंजूर झालाच तर जोपर्यंत तो ठराव रद्द केला जात नाही, तोपर्यंत प्रत्येक बोर्ड मिटींगला याचा जाब विचारणार. हा ठराव होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या संघर्षास आम्ही तयार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राजारामच्या नव्या पोटनियम दुरुस्ती मध्ये सलग ३ वर्ष ऊस पुरवठा केला पाहिजे, ही जाचक अट घालण्यात आली आहे. १९६० च्या सहकार कायद्यामध्ये पाचपैकी एक वर्ष ऊस पुरवठा व वार्षिक सभेला उपस्थितीची तरतूद आहे. उमेदवार, सूचक आणि अनुमोदक यांनी मागील पाच पैकी चार वर्ष ऊस पुरवठा केला पाहिजे व वार्षिक सभांना उपस्थिती राहिले पाहिजे, अशी दुरुस्ती जाचक आहे. ती जाणीवपूर्वक करण्यात आली असून आपल्याला नको असलेल्या सभासदांचे सभासदत्त रद्द करण्याची ही व्यवस्था आहे. त्यामुळे याला आमच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचा विरोध आहे, असे माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी स्पष्ट केले.

मयत सभासदांच्या वारसांची नोंद जाणीवपूर्वक टाळण्यात येत आहे, उलट ज्याच्या नावे ऊस नाही, सातबारा नाही अशांना सभासद करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक अजित पोवार धामोडकर यांनी केला. पत्रकार परिषदेस श्रीराम सेवा संस्थेचे सभापती उमाजी उलपे, उपसभापती दत्तात्रय मासाळ, यांच्यासह संचालक माजी नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news