Kolhapur Flood | कोल्हापुरात पूर! पंचगंगेची मच्छिंद्री कधी होते?

पंचगंगा नदी पातळी ४५ फूट २ इंचावर
Kolhapur Rain Updates
Kolhapur Rain UpdatesPudhari Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क 

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने ९१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता ४५ फूट २ इंच इतकी होती. जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. कोल्हापुरात पूर आला की पंचगंगेची मच्छिंद्री झाला का? अशी विचारणा केली जाते. जाणून घेवूया मच्छिंद्री म्हणजे काय? (Kolhapur Flood Updates)

पंचगंगा नदीने इशारा आणि धोका पातळीही ओलांडली

जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या कोसळधारा सुरूच आहेत. गुरुवारी (दि.२५) शहरात दिवसभर पावसाचे धूमशान सुरू होते. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर कमी दिसून आला. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट आहे. पण नदीने इशारा आणि धोका या दोन्ही पातळ्या ओलांडल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

पंचगंगेची मच्छिंद्री म्हणजे काय?

कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक शिवाजी पूल हा श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत १८७४ ते १८७८ या कालावधीत बांधला गेला. जी. एस. अँडरसन या ब्रिटीश अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली बांधकामास सुरु झालेला हा पूल एफ. श्वेंडरच्या अधिकाऱ्याच्या काळात पूर्ण झाला.

कोल्हापुरात पूर आला की, पंचगंगेची मच्छिंद्री झाली का? अशी विचारणा केली जाते. मच्छिंद्री म्हणजे पंचगंगा नदीच्या पाण्याची उच्च पातळी होय. शिवाजी पुलाला माश्याच्या आकाराचे एकूण पाच दगडी पिलर आहेत. पुलाच्या कमानीवर कोरलेल्या माश्यावर जेव्हा पावसाचे पाणी येते. तेव्हा पंचगंगेची मच्छिंद्री झाली असे म्हणतात. मच्छिंद्री झाली की पावसाचे पाणी शहरात यायला लागते आणि पूर आला असे समजले जाते.

सध्या जुना शिवाजी पुल वाहतुकीस बंद असून नवीन पूल वाहतुकीस सुरु (पावसामुळे गेले चार दिवस बंद आहे) आहे.

शिवाजी पूल वाहतुकीस बंद

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी-रजपूतवाडी दरम्यान पाणी आल्याने पोलिसांनी शिवाजी पुलावरील वाहतूक बुधवारी (२४) रात्री बंद केली. अद्यापही हा वाहतूक मार्ग वाहतुकीसाठी सुरु नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news