

Warana river water level
खोची : वारणा नदीची पाणी पातळी गुरुवारी (दि.२१) रात्री आणखी एक फुटाने वाढली. सकाळी पाणीपातळी स्थिर झाली. तर सलग दुसऱ्या दिवशी खोची परिसराला पावसाची संपूर्ण उघडीप मिळाली. त्यामुळे वारणेच्या महापुराची शक्यता कमी झाली आहे. परंतु, नदीकाठची पिके पाण्याखाली असल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे पूर लवकर ओसरण्याची अपेक्षा वारणाकाठ शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
शनिवारपासून (दि. 16) पासून वारणा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणातून होणारा विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक यामुळे वारणा महापुराच्या दिशेने वाटचाल करत चालली होती. त्यामुळे खोची, भेंडवडे परिसरातील काही घरात पाणी शिरले होते. पण प्रशासनाने योग्य तजवीज करून ग्रामस्थांचे स्थलांतर केले.
गुरुवार रात्री पाणीपातळीत धारेवर एक फुट वाढ झाल्यानंतर सकाळी वारणा पुराने दम टाकला. यामुळे वारणा काठाने सुटकेचा निश्वास सोडला. पाणी पातळी गणेश मंदिराच्या पुढे आल्यामुळे धास्ती वाढली होती. या पार्श्वभूमीवर पाणीपातळी स्थिर झाल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पिकांना जीवदान मिळण्यासाठी लवकर पूर ओसरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.