

कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी एका दिवसात दोन फुटांनी वाढली असून, नदी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज गुरुवारी (दि.२४) जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे, तर पुढील दोन दिवसांसाठी 'ऑरेंज अलर्ट' दिला असल्याने पूरस्थितीची चिंता वाढली आहे.
पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या पाणीपातळीत होणारी वाढ अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर कालच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला शिंगणापूर बंधारा, अवघ्या २४ तासांत पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. पंचगंगेची सध्याची पाणीपातळी १८.५ फुटांवर पोहोचली असून, जिल्ह्यातील एकूण ८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे असलेले राधानगरी धरण आता ९४ टक्के भरले असून, कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज (दि.२४) जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच नदीपात्राजवळ जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.