Kolhapur News | बंदोबस्त घ्या; पण पंचगंगा प्रदूषण नियंत्रण कामे दीड वर्षात पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

विलंब झाल्यास कारवाई
Kolhapur News |
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण नियंत्रणप्रश्नी मंगळवारी आयोजित बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे. यावेळी उपस्थित अधिकारी.Pudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका व जिल्हा परिषदेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ड्रेनेजलाईन आणि पंपिंग स्टेशनसह पंचगंगा प्रदूषण नियंत्रणाची सर्व कामे दीड वर्षात पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी दिले. या कामांत विलंब झाला तर कारवाई करा, वेळोवेळी भेटी देऊन कामाच्या सद्यस्थितीचा अहवाल दर महिन्याला द्या, असे आदेशही त्यांनी दिले.

पंचगंगा प्रदूषण नियंत्रणप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलताना येडगे म्हणाले, पंचगंगा प्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उपाययोजनांची कामे गतीने पूर्ण करा. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा. औद्योगिक क्षेत्र व साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील सांडपाण्याबाबत ऊस गाळप करण्यापूर्वी, गाळप सुरू असताना व गाळप पूर्ण झाल्यानंतर वेळोवेळी बैठका घ्या, कडक सूचना द्या. त्याचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत शून्य निकसन (झेडएलडी) प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करा.

दरमहा दुसर्‍या सोमवारी आढावा

यापुढे दर महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदूषण नियंत्रणाबाबत बैठक होईल. या बैठकीला संबंधित विभागप्रमुखांनी सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी भेटी देऊन त्याबाबतच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

रंकाळ्यातील जलचरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा

शहराच्या सौंदर्यात भर घालणार्‍या रंकाळा तलावाची प्रवेशद्वारे आकर्षक व सुशोभित करा. त्याचबरोबर रंकाळ्यातील जलचरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना राबवण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून गणेशोत्सवादरम्यान राबवण्यात येणार्‍या उपाययोजनांमध्ये आणखी सुधारणा करून नागरिकांचा प्रतिसाद वाढण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, इचलकरंजी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परिट, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

इंदूरच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापनाचे प्रयत्न

प्लास्टिकबंदी प्रभावीपणे करा. त्याकरिता सर्व आस्थापना, दुकाने, शाळा, धार्मिकस्थळे, बसस्थानके आदी ठिकाणी प्लास्टिकबंदीसाठी सूक्ष्म नियोजन करा, जनजागृती करा, अशा सूचना देत इंदूरच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news