

Radhanagari Gaganbawada Panhala Gaur Terror
दिगंबर लोहार
म्हासुर्ली : धामणी खोऱ्यात गव्यांच्या वाढत्या उपद्रवाने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतातील पिकांचे नुकसान करण्याबरोबरच गव्यांकडून आता नागरिकांवरही जीवघेणे हल्ले होऊ लागले आहेत. एप्रिल महिन्यात गवशी (ता. राधानगरी) येथील शेतकरी संतू लहू आंबुसकर यांच्यावर गव्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर बावेली (ता. गगनबावडा) येथे ऊसतोड मजूर शेतकरी प्रकाश रंगराव चव्हाण आणि इश्वरा बोडके यांच्यावर गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा गव्यांच्या उपद्रवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जंगलातून थेट शेतशिवारात गव्यांचा वावर
राधानगरी, गगनबावडा आणि पन्हाळा या तीन तालुक्यांतील काही गावांचा परिसर धामणी खोऱ्यात विखुरलेला आहे. या परिसरात दोन्ही बाजूंनी घनदाट वनराईने व्यापलेल्या डोंगररांगा असून, त्या दाजीपूर अभयारण्याला जोडलेल्या आहेत. त्यामुळे अभयारण्यात अधिवास असलेल्या गव्यांचा वावर आसपासच्या डोंगररांगांमध्येही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आता गव्यांचा वावर केवळ जंगलापुरता मर्यादित राहिलेला नाही. ते थेट शेतशिवार आणि मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचू लागल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिकांचे नुकसान; शेती करणेही झाले कठीण
धामणी खोऱ्यातील बहुतांश शेती डोंगरपायथ्याशी आहे. त्यामुळे शेतांमध्ये गव्यांचा वावर सातत्याने वाढत आहे. भात पिकांच्या रोपलागणीच्या हंगामात रोपांसाठी तयार केलेले तरवे गव्यांकडून फस्त केले जातात. परिणामी, अनेकदा रोपलागण न करताच शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. खरीप पिकांपासून ऊस पिकापर्यंत गव्यांकडून वर्षभर नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतीच्या नुकसानीपलीकडे आता जीविताला धोका
गव्यांचा उपद्रव केवळ शेतीच्या नुकसानीपुरता मर्यादित राहिलेला नाही. यापूर्वी म्हासुर्ली येथे गव्याच्या हल्ल्यात एका गाभण म्हशीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गवशी येथील संतू आंबुसकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्यातून ते बचावले असले, तरी त्यांना कायमस्वरूपी शारीरिक व्यंगाला सामोरे जावे लागले. आता बावेली येथील प्रकाश चव्हाण यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिक वाढले आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
वनविभागाकडून सावधानतेचे आवाहन
वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, संपूर्ण परिसर जंगलाने व्यापलेला असल्याने गव्यांचा मानवी वस्त्यांमधील वावर रोखण्यावर मर्यादा येत आहेत. शेतीचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्यास तातडीने पंचनामे करून नियमानुसार मदत दिली जात असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येते. मात्र, नागरिकांवरील वाढते हल्ले लक्षात घेता शेतात जाताना आणि जंगलालगतच्या भागातून प्रवास करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
दरम्यान, गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेती करायची कशी आणि शेतात जायचे तरी सुरक्षितपणे कसे, असा प्रश्न धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वन्यजीव संरक्षणासोबतच मानवी जीवित आणि शेतीचे रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
धामणी नदी मागील वर्षीपासून बारमाही प्रवाहित झाली आहे. शेती बहरु लागली आहे. शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण असताना हीच शेती गव्यांच्या उपद्रवाला बळी पडू लागली आहे. त्यामुळे उत्साहावर विरजण पडत असल्याचे चित्र आहे.
- संदिप पाटील, शेतकरी गवशी (पाटीलवाडी)