

कुरुंदवाड : पंचगंगा नदीवरील नृसिंहवाडी - कुरुंदवाड पुलावर रविवारी सकाळी क्रेनने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत बुबनाळ (ता. शिरोळ) येथील टेलरिंग व्यावसायिक अल्ताफ हुसेन कमाल बुबनाळे (वय ४९) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बुबनाळसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अल्ताफ बुबनाळे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरून कुरुंदवाडच्या दिशेने जात होते. नृसिंहवाडी- कुरुंदवाड पुलावर आले असता त्यांच्या दुचाकीला क्रेनने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अपघातामुळे पुलावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते गोटू खबाले, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापूरे, शाहीद पटेल, यांच्यासह नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. या अपघातामुळे नृसिंहवाडी - कुरुंदवाड पुलावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.