आशिष पाटील
गुडाळ : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवस होणाऱ्या दमदार अतिवृष्टीमुळे आज (दि.१९) दुपारी चार वाजता राधानगरी धरण ७०. ०३ टक्के भरले आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत धरणामध्ये तब्बल सात टक्के पाणी संचय वाढला आहे.
आज पाणीपातळी 332.85 वर पोहोचली
गुरुवारी सायंकाळी चार वाजता धरणाची पाणी पातळी 328.60 होती. तर धरण 63.03 % एवढे भरले होते. 24 तासांत झालेल्या दमदार पावसामुळे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता पाणीपातळी 332.85 वर पोचली तर धरण 70.03 % एवढे भरले. गुरुवारी दुपारी चार वाजता 5233 :14 दशलक्ष घनमीटर असलेला पाणीसाठा शुक्रवारी दुपारी चार वाजता 5858:35 द.ल. घ.मि. एवढा होता.
विद्युतगृहासाठी 1400 ते 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
महापुराच्या काळात पाणी विसर्गाचे योग्य नियोजन रहावे, म्हणून जलसंपदा विभाग यावर्षी जूनच्या प्रारंभापासूनच सतर्क आहे. मागील काही दिवस धरणाच्या विद्युतगृहासाठी 1400 ते 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. साधारणपणे हा विसर्ग धरण भरल्यानंतर उघडणाऱ्या स्वयंचलित दरवाजापैकी एका दरवाजा मधून होणाऱ्या पाणी विसर्गा एवढा आहे.
