Kolhapur News : तीन दशकांनंतर साकारला पारंपरिक ‘श्रीयाळ राजा’

गडहिंग्लजमध्ये रात्रभर जागून चिखल-मातीतून साकारली देखणी कलाकृती; जुन्या आठवणींना उजाळा
Kolhapur News
Kolhapur News
Published on
Updated on

प्रवीण आजगेकर

गडहिंग्लज : काळाच्या ओघात लुप्त झालेल्या लोकपरंपरा नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न शहरातील नदीवेस परिसरात करण्यात आला. श्रावण शुद्ध षष्ठीनिमित्त नदीवेस शेकोटी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल तीन दशकांनंतर पारंपरिक पद्धतीने ‘श्रीयाळ राजा’ साकारला. माती आणि चिखलापासून तयार करण्यात आलेली ही कलाकृती पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची पावले नदीवेसकडे वळली. विशेषतः, ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमामुळे जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले.

नदीवेस परिसरात पूर्वी श्रीयाळ षष्ठीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात होता. परिसरातील मंडळी एकत्र येऊन मातीपासून श्रीयाळ राजाची प्रतिकृती तयार करीत. यानिमित्ताने रात्रभर जागरण, मूर्ती तयार करण्याची लगबग आणि दुसर्‍या दिवशी तिचे दर्शन घेण्यासाठी होणारी गर्दी, असे वातावरण असायचे. कालांतराने ही प्रथा बंद पडली. नव्या पिढीला तर या परंपरेची माहितीही उरली नव्हती. यंदा शेकोटी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ही परंपरा पुन्हा सुरू केली.

चिखल, माती आणि अन्य साहित्याचा वापर करून श्रीयाळ राजाची मोठी प्रतिकृती साकारण्यात आली. पारंपरिक ढंग कायम ठेवताना राजाचे मोठे पोट, हातातील चिलीम आणि बसण्याची विशिष्ट ठेवण याकडे विशेष लक्ष देण्यात आले. रात्र जागून कार्यकर्ते मूर्ती साकारण्याच्या कामात व्यस्त होते. यशवंत कुंभार, धनाजी कुंभार, वसंत कुंभार, सुरेश केसरकर, बजरंग पाटोळे, वसंत खोत, रामा खोत, शशिकांत मोहिते, आप्पा रिंगणे, सुनील रिंगणे, शेखर रिंगणे, पापा मुल्ला यांच्यासह सदस्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news