सिद्धनेर्ली; पुढारी वृतसेवा : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी कागल-मुरगुड रोड काही काळ रोखून धरण्यात आला होता. आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी, शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान त्वरित मिळावे, खतांचे दर कमी करावेत, शेतीमालाच्या हमीभावाची निश्चिती करावी, ऑनलाइन वजन काटे करावेत, सक्तीने विज बिल वसुली थांबवावी, चुकीची वीजबिले दुरुस्त करावीत, ऊसतोड टोळीकडून होणाऱ्या आर्थिक लुटीला पायबंद घालावा, टोळी मुकादमाकडून होणारी फसवणूक थांबावावी व महामंडळाकडून ऊसतोड मजूर पुरवावेत, यासह अन्य मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत. शासनकर्त्यांचा आणि आमचा लढा संपलेला नाही. आम्ही कधीही संघर्षासाठी रस्त्यावर उतरू शकतो, असा इशारा चक्काजाम आंदोलनातून देण्यासाठी आज शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी दिला.
या आंदोलनात स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष बाळासो पाटील, तानाजी मगदूम, राजेंद्र बागल, अविनाश मगदूम, अनिल पाटील, राजेंद्र खोंद्रे, रावसो मृदूंडे, युवराज संकपाळ, अशोक शेणवी, नामदेव शिपेकर यांच्यासह परीसरातील शेतकरी सहभागी झाले होते.