सरूड : शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सरूडकर यांना राजकीय मोर्चेबांधणीबाबत महत्वाच्या सूचना दिल्या. शिवाय लोकसभा निवडणुकीत मविआकडून ऐनवेळी उमेदवारी मिळूनही महायुतीच्या उमेदवारा विरोधात दिलेल्या लढतीबद्दल सरूडकरांचे त्यांनी कौतुकही केले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांचा महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विद्यमान आमदार विनय कोरे यांच्याशी पुन्हा एकदा मुकाबला होणार आहे. याआधी विनय कोरेंनी सरुडकरांविरुद्ध दोनदा विजय मिळवला असून सरुडकर कोरेंविरुद्ध एकदा विजयी झाले आहेत. आगामी विधानसभेला या आजी-माजी आमदारांमध्ये चौथ्यांदा लढत होणार आहे. त्यासाठी दोन्ही उमेदवार शह-काटशह देत जोरदार तयारीला लागल्याचे पाहायला दिसत आहे. यादृष्टीने सरुडकरांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे..
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआच्या नेत्यांनी महायुतीच्या विरोधात जोरदार कंबर कसली आहे. यामध्ये आघाडी अंतर्गत आपापसातले वादविवाद, हेवेदावे विसरून एकास एक लढतीवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. पवार यांची जिल्ह्यातील विधानसभेला इच्छुक असणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेऊन बंद दाराआड कानगोष्टी केल्या.
दरम्यान, कोल्हापूर येथील पंचशील हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबलेल्या शरद पवार यांची आज (दि. ४) सकाळी शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे प्रमुख दावेदार सत्यजित पाटील यांनी भेट घेतली. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार हे त्यांच्यासोबत उपस्थित होते. पवार यांच्याशी झालेल्या संवादामध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत पक्की रणनीती आणि राजकीय तडजोड, गोळाबेरीज यादृष्टीने महत्वाची सल्लामसलत झाले. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीतील कटाजोड लढतीवरही पवार यांनी भाष्य करताना महायुतीच्या उमेदवाराची चांगलीच दमछाक केल्याची सरूडकरांची राजकीय प्रशंसा केली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवसापासून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सरुडकर यांनी सांगताच निवडणुकीच्या दृष्टीने लागणाऱ्या मदतीचे आश्वासन पवार यांनी सरुडकरांना दिले. शिवाय मविआच्या वरिष्ठ नेत्यांशी समन्वय राखण्याची सूचनाही दिली.