सतेज पाटील यांना आमदार केले ही आपली मोठी चूक : महादेवराव महाडिक

सतेज पाटील यांना आमदार केले ही आपली मोठी चूक : महादेवराव महाडिक

वडणगे; पुढारी वृत्तसेवा :  सतेज पाटील यांना पहिल्यांदा आपण आमदार केले ही आपली मोठी चूक होती हे आज कळून चुकले. स्वार्थी व मतलबी असलेल्या सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्याबाबत सभासद व शेतकर्‍यांची दिशाभूल चालविल्याचा आरोप माजी आ. महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी केला. वडणगे (ता. करवीर) येथील पार्वती मंदिराच्या आवारात छत्रपती राजर्षी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा राजर्षी शाहू आघाडीच्या (महाडिक पॅनेल) प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे. सभासदांचे नेहमी हित जपले आहे. सभासदांना पाच रुपये किलो दराने साखर देणारा राजाराम कारखाना राज्यात एकमेव आहे. येत्या काळात 18 मेगावॅटचा को-जनरेशन प्रकल्प व रोज पाच हजार टनांपर्यंत गाळप क्षमता वाढवणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काय होणार हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नसल्याचेही महादेवराव महाडिक म्हणाले.

गेली सत्तावीस वर्षे राजाराम कारखाना महादेवराव महाडिक यांनी सभासदांच्या मालकीचा ठेवला आहे. को जनरेशन, डिस्टिलरी व इतर उपपदार्थ निर्मितीसाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी कारखाना कर्जबाजारी होईल म्हणून विरोध केला. आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर कारखान्याचा विस्तार केला नाही, अशी दुटप्पी भूमिका ते घेत असल्याचे अमल महाडिक म्हणाले.

यावेळी तानाजी पाटील (मुडशिंगी), दिलीप पाटील, धनाजी पाटील (शिरोली), डॉ. एम. बी. किडगावकर (निगवे दुमाला), सदाशिव कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक इंद्रजित पाटील (वडणगे ) यांनी केले. यावेळी वडणगेच्या लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील, सदाशिव पाटील (मास्तर), बाजीराव पाटील, सत्यजित कदम, भगवान काटे यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार, कारखाना सभासद, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी संघाच्या जागेवर फाईव्ह स्टार हॉटेल :  खा. महाडिक

केवळ मोक्याच्या जागा हडप करण्यासाठी बंटी पाटील यांना सत्ता हवी असते. ताराराणी चौकानजीकची शेतकरी संघाची जागा हडप करून तिथे त्यांनी फाईव्ह स्टार हॉटेल बांधले. मौनी विद्यापीठातील सर्व संचालकांना हटवून तेथील सत्ता बळकावली. तिथे कधीही निवडणुका होत नाही, असे खा. महाडिक आपल्या भाषणात म्हणाले.

क्रिकेटचे मैदान करण्याचा डाव

राजाराम कारखाना मोडून त्या ठिकाणी क्रिकेटचे मैदान करण्याचा पाटील यांचा डाव असल्याचे सदाशिव कुलकर्णी म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news