सैनिक टाकळी: पुढारी वृत्तसेवा : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील रेणुका मंदिरचे पुजारी आणि गावकऱ्यांचे श्रद्धास्थान परशराम काटकर (देवआई) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांनी देवी आणि गावची तब्बल ६० वर्षे सेवा केली. दि. ३० एप्रिलरोजी यल्लमा देवीचा जागर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या जागराच्या वेळी देव आईने हा माझा शेवटचा भंडारा असल्याचे घोषित केले होते. यापुढील भंडारा गावकऱ्यांनी अत्यंत गुण्यागोविंदाने आनंदाने पार पाडावा, असे त्यांनी संपूर्ण गावकऱ्यांसह भक्तगणांना आवाहन केले होते. आज त्यांचे असे आकस्मित निधन झाल्याने संपूर्ण टाकळी परिसरावर शोककळा पसरली आहे.
भक्तगण त्यांना देव मामा या नावाने ही ओळखत होते. आणि आज ते अनंतात विलीन झाले. टाकळी येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. परिसरातून आलेल्या त्यांच्या भक्तगणांनी साश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या कुटुंबावरील देव आईचे छत्र हरपले. हे पाहून गावातील महिलांनाही अश्रू अनावर झाले. संपूर्ण गाव भावूक झाले होते.
देवआई च्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. या सर्वांनी देवआईच्या अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. फुलांचा वर्षावर करत देव आईची अंत्ययात्रा काढण्यात आली. काही जणांकडून उदं,गं,आई,उदं.. अशा घोषणा केल्या जात होत्या. शेकडो महिला, पुरुष, तरुण, तरुणी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून शेवटचा नमस्कार करत होते. यानंतर देवमामा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवमामा यांचे कुटुंबीय, नातेवाईक, गावकऱ्यांनी साश्रूनयांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
हेही वाचा